लेह लडाख - भाग ६ पॅंगॉंग - चांग ला पास, हेमीस मोनॅस्टरी, थिकसे मोनॅस्टरी
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
लेह लडाख - भाग १रात्री पॅंगॉंगला फारच थंड होतं. काल मी जवळ असलेले सर्व गरम कपडे अंगात चढवले होते. माझा एस्किमो झाला होता म्हणायला हरकत नाही. इथे फार कडाक्याची थंडी असल्यामुळे कधी एकदा तिथून निघतो असं झालं होतं.
आज सकाळी न्याहारी करून ८:३० वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आज परत एकदा पॅंगॉंगला भेट दिली. पण सकाळपेक्षा संध्याकाळचा नजारा जास्त चांगला दिसतो. आज लेहला चांग ला पास रस्त्याने जाणार होतो. चांग ला पासही खारदुंगला सारखाच उंचावराचा पास आहे. आजच्या रस्त्यावरच दृष्य अजूनच वेगळ होत. आज सर्व बाजूला हिमाच्छादित शिखरं होती. रस्त्याच्या बाजूला खूप ठिकाणी थिजलेला बर्फ होता.
वाटेत एका ठिकाणी थांबून बर्फात खेळलो. पण आजचा बर्फ जमिनीवरचा नव्हता. खालून पाणी वहात होतं. कडेकडेने उन्हामुळे बर्फ वितळायला सुरुवात झाली होती आणि बर्फाचा थर पातळ व्हायला लागला होता. पटापट फोटो काढले आणि पुढे निघालो.
वाटेत एके ठिकाणी याकचा मोठा कळप चरताना दिसला. किमान ७०-७५ तरी याक असतील. आजचा पूर्ण रस्ता फारच सुंदर होता. बाहेरून नजर हटत नव्हती. आम्ही १२ वाजता चांग ला पासवर पोहोचलो. इथेही आजूबाजूला बर्फ होता. हवा बऱ्यापैकी गार होती.
५-१० मिनिटं पासवर थांबून आम्ही परत गाडीमध्ये बसलो. गाडी निघाली. अचानक हवा बदलली. ढग दाटून आले आणि हिमवर्षावाला सुरुवात झाली. हिमवर्षाव अगदी १५ मिनिटच टिकला. पण मजा आली.
एकदा चांग ला पासवरून खाली उतरायला सुरुवात केल्यावर सगळं दृष्यच बदलून गेलं. हिमाच्छादीत शिखरं मागे पडली आणि परत भुरे पहाड सोबतीला आले. एकदम शार्प हेयरपिन बेंडस्.
इथे सैन्यासाठी रस्ता रुंदीकरणाच काम चालू आहे. शिवाय हा पूर्ण हिमस्खलन होऊ शकतो असा भाग आहे. त्यामुळे इथला बराच रस्ता हा कच्चा रस्ता आहे.
लेहच्या जवळ अनेक मोठ्या मोनॅस्टरी आहेत. आम्ही त्यापैकी दोन मोनॅस्टरी बघायच्या ठरवल्या. पहिल्यांदा हेमिस मोनॅस्टरीमध्ये गेलो.
हेमिस मोनॅस्टरीमध्ये मोठं संग्रहालय आहे. तिथे अनेक दालनं आहेत. तिथे लडाखच्या संस्कृती बद्दल माहिती देणारी चित्र आहेत, बौद्ध धर्माची माहिती देणारी चित्र आहेत, बुद्धाच्या जीवनावर आधारित चित्र आहेत, मोठ्या लामांच्या जीवनावर आधारित दालनं आहेत, त्यांनी पूजेत वापरलेल्या अनेक वस्तू आहेत, स्वयंपाक घरातील भांडी आहेत, वाद्य आहेत, शस्त्र आहेत, जुने धर्म प्रसार करणारे आलेख आहेत, ध्वज आहेत, पुस्तकं आहेत. बऱ्याचशा वस्तू लडाख, काश्मीर, तिबेट भागातून जमा करण्यात आल्या आहेत. सर्व वस्तू जवळ त्या कुणाच्या आहेत, कुठे मिळाल्या, कुठे तयार झाल्या, कुठल्या पदार्थापासून बनवल्या आहेत, कधी बनल्या आहेत अशी सगळी माहिती नमूद केलेली आहे. संग्रहालयाशिवाय मोठं प्रार्थना मंदिर आहे. आत छायाचित्र घ्यायला परवानगी नाही. त्यामुळे हा एक बाहेरून घेतलेला फोटो.
हेमिस मोनॅस्टरीनंतर आम्ही थिकसे मोनॅस्टरीला भेट दिली. थिकसे मोनॅस्टरीला गेल्यानंतर कळलं की आज तिथल्या मुख्य लामांचा ८० वा जन्म दिवस आहे. त्यानिमत्ताने तिथे अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आज मोनॅस्टरी बंद होती. पण मोनॅस्टरीचं बाहेरून जे दर्शन झालं ते सुद्धा मन प्रसन्न करणार होतं.
थिकसे मोनॅस्टरी
मुख्य प्रवेशद्वार
थिकसे मोनॅस्टरीमधील उपहारगृहाचा दरवाजा
प्रेयर व्हील
स्तूप
आम्ही संध्याकाळी लेह मध्ये परतत असताना सोनम वांगचुक यांच्या शाळेचं "SECMOL" बाहेरून दर्शन घडलं. सध्या शाळा चालू असल्यामुळे आतून बघायला परवानगी नाही. परिसर बाहेरून छान दिसतो.
आम्ही ५:१५ च्या दरम्यान हॉटेल मध्ये पोहचलो. संध्याकाळी बाजारात फेरफटका मारून आलो. आता उद्या लेह शहराचा फेरफटका. सहलीचा शेवटचा दिवस!!
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
Comments
Post a Comment