लेह लडाख - भाग ८ परतीचा प्रवास, आठवणींचे कवडसे
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा. लेह लडाख - भाग १ लेह लडाख - भाग २ लेह लडाख - भाग ३ लेह लडाख - भाग ४ लेह लडाख - भाग ५ लेह लडाख - भाग ६ लेह लडाख - भाग ७ आमची आजची फ्लाईट सकाळी ६:५० वाजताची होती. विमानतळावर गेल्यावर ती उशीराने निघणार असल्याचं समजलं. आजचा आमचा प्रवास थेट मुंबईला नव्हता. दिल्लीला विमान बदलायला लागणार होतं. सुदैवाने २०-२५ मिनिटापेक्षा जास्त उशीर नव्हता. साधारण ७.२० च्या अंदाजात विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलं. तेव्हा सूर्योदय झालेला होता आणि सगळीकडे लख्ख प्रकाश पसरला होता. मागच्या वेळेपेक्षा या वेळी दिसणारं दृष्य फारच अद्भूत होतं. पाहावं तिकडे बर्फाच्छादित शिखरं पसरलेली होती. मधूनच गडद निळे ढगांचे पुंजके डोकावत होते. आजचा नजारा खरंच अवर्णनीय आणि शब्दातीत होता. फक्त नजरेत साठवून घ्यायचा. जवळ जवळ १०-१२ मिनिटं या दृश्याचा आस्वाद घेता आला. दिल्लीला विमानतळावर पोहोचल्यावर कळलं की पुढे मुम्बईला जाणारं विमानसुध्दा उशिरा जाणार आहे. किमान २-३ तास तरी विमानतळावर थांबायला लागणार होता. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी या न्यायाने एकदा परतीचा प्र...