लेह लडाख - भाग ७ लेह शहराची सफर - हॉल ऑफ फेम, झोरावर फॉर्ट, शांती स्तूप, लेह पॅलेस, बाजार
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
सगळ्यात पहिल्यांदा हॉल ऑफ फेमला भेट दिली. हॉल ऑफ फेम हे भारत पाकिस्तान युद्धामध्ये विशेषतः कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीरांच स्मारक आहे.
बाहेर होवित्झर तोफा, बी आरडीएम, आरसीएल अशी युद्ध सामग्री होती. इथे मोठं संग्रहालयही आहे. हॉल ऑफ फेम मध्ये अनेक दालनं आहेत.
एका दालनामध्ये लडाखची माहिती आहे - इथले लोक, त्यांच्या श्रध्दा, अन्न, कपडे, फळं, फुलं, प्राणी इ. दुसऱ्या दालनामध्ये भारत पाकिस्तान युध्दात पराक्रम गाजवणाऱ्या आणि शोर्य पुरस्कार दिलेल्या वीरांचे फोटो आणि माहिती आहे. एक दालन हे खास ऑपरेशन विजयला समर्पित आहे. इथे कारगिल युद्ध का झालं, कसं झालं, त्या अंतर्गत कोणत्या कारवाया करण्यात आल्या याची सविस्तर माहिती दिली आहे. काही माहिती फलक आहेत, काही माहितीपट दाखवले जातात, तिथे वापरण्यात आलेली शस्त्र ठेवली आहेत, शत्रूच्या सैनिकांकडून हस्तगत केलेली कागदपत्र, शस्त्र ठेवली आहेत. एका भागात पूर्ण सियाचेनची माहिती आहे - आपले सैनिक कुठे राहतात, काय घालतात, काय खातात, कुठली साधनं वापरतात याची माहिती देणारे फलक आहेत, तसेच काही वस्तू ठेवल्या आहेत. इथे एक भेटवस्तू विक्री दालनं आहे. बाहेरच्या बाजूला स्मारक आहे. बघता बघता दोन अडीच तास कसे गेले ते कळलंच नाही. हे संग्रहालय पाहून मनात देशभक्तीची भावना निर्माण नाही झाली तर नवल!
नंतर आम्ही झोरावर फोर्टला गेलो. झोरावर सिंग हा डोग्रा राजा गुलाब सिंह यांच्या सैन्यातला अधिकारी होता. त्याने अनेक लष्करी मोहिमा राबवून उत्तरेकडे लडाखच्या सीमा विस्तारल्या. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ किल्ल्याला त्याचं नाव देण्यात आलं आहे. आता तिथे छोट संग्रहालय आहे. तिथे डोग्रा घराण्याची आणि त्यांच्या लडाख मधल्या कामगिरीची माहिती आहे. Tyanchya काही जुन्या वस्तू ठेवण्यात आल्या आहेत जसं की जडजवाहीर ठेवण्याची पेटी, पिस्तुल, कपडे इ. बाकी तिथे फार काही नाहीये.
आमचा तिसरा पडाव होता शांती स्तूप. शांती स्तूप हा १९९१ मध्ये जपानच्या भिक्षूनी बांधला आहे. बौद्ध धर्माला २५०० वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त याची निर्मिती करण्यात आली. हा स्तूप तर सुंदर आहेच. पण इथून लेह शहराचा छान देखावा दिसतो.
आमचं सगळ्यात शेवटचं ठिकाण होतं लेह पॅलेस. लेह पॅलेस हा राजा सेंगे नामग्याल यांनी बांधलं होता. हा मध्ययुगीन तिबेटन वास्तुशास्त्राचा नमुना आहे. या पॅलेसला ९ मजले आहेत. खालच्या मजल्यांवर कोठार, तबेले होते तर राजे वरच्या मजल्यावर राहायचे. आता तिथे फक्त या वास्तूचा सांगाडा उभा आहे. आत काहीच वस्तू शिल्लक नाहीत. जेव्हा डोग्रा राजांनी लडाखवर चढाई केली तेव्हा राजे लोक हा पॅलेस सोडून दुसरीकडे निघून गेले. पॅलेस मधल्या छतावरून लेह शहर आणि आजूबाजच्या प्रदेशाचा नजारा बघायला मिळतो.
आता आमचं पर्यटन संपलं होतं असं म्हणायला हरकत नाही. आता फक्त खरेदी शिल्लक होती. खरेदी हा तसंही सगळ्यांच्या विशेषतः बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. लेहमध्ये एक मुख्य बाजार आहे जिथे हर तऱ्हेची खरेदी करता येते. मोती बाजार हा खास मोती, चांदीचे दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय तिबेटन बाजार आहे. आपण लेह मधे अनेक तऱ्हेची खरेदी करू शकतो.
१. गरम कपडे - इतर नेहेमीच्या लोकरीच्या कपड्यांबरोबर इथले याकच्या लोकरीपासून बनवलेले कपडे आणि पश्मिना शाली प्रसिद्ध आहेत.
२. काश्मिरी कशिदा असलेले कपडे - यामध्ये तयार कपडे, ड्रेस मटेरीयल, शाली, स्टोल असे विविध प्रकार बघायला मिळतात.
३. रग, गालिचे
४. चांदीचे दागिने, खड्यांचे दागिने
५. तिबेटच्या संस्कृतीने प्रेरित झालेले हॅंडिक्राफ्ट शो पीस, भांडी
६. सुकामेवा
७. जर्दाळूचा जाम किंवा जर्दाळू पासून बनवलेले इतर पदार्थ.
८. सिंगिंग बाऊल, सौऊर्जेवर चालणारे/ हलणारे प्रेयर व्हील, उपासना करणारे लामा
९. की चेन, मॅग्नेट
इथला मेन बाजार चालायला सुखावह आहे. कारण बाजारात वाहनांना प्रवेश नाही. बाजार खूप मोठाही नाही आणि अगदी छोटही नाही. दिवसा हवा पण ठीक असते. त्यामुळे २-३ तास असे जातात कळतही नाही. तर अशा प्रकारे आमचा शेवटचा दिवस संपला. आता उद्या परतीचा प्रवास.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
Comments
Post a Comment