लेह लडाख - भाग १ प्रवासाची तयारी
मागची दोन वर्ष कोविडमुळे घराबाहेर पडता आलं नव्हतं. घरकाम आणि ऑफिसच काम करून आयुष्य एकदम एकसुरी झालं होतं. बाहेरच वातावरण जसं निवाळायला लागलं तसे प्रवासाचे वेध लागले. कुठे जायचं अशा चर्चेला सुरवात झाली. उन्हाळा असल्यामुळे एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी जावं असं वाटत होतं. उत्तरेकडे हिमालयात जाऊया यावर एकमत झालं. मी यापूर्वीही हिमालयात गिर्यारोहण करण्यासाठी हिंडले आहे. एकदा तुम्ही हिमालयातल्या आतल्या भागात फिरला असाल तर कुलू, मनाली, खाज्जियार अशा अगदी टीपिकल ठिकाणांच आकर्षण वाटत नाही. मग अशाच चर्चांमध्ये लेह लडाखचं नाव समोर आल आणि त्यावर लगेच एकमत झालं.
ठिकाण नक्की झालं की मग लगेच पुढचा प्रश्न आपलं आपण जायचं की एखाद्या यात्रा कंपनी सोबत जायचं. कामात खूप व्यस्त असल्यामुळे वाटलं की यात्रा कंपनी सोबत जाऊ या, म्हणजे कसलीच झंझट रहाणार नाही. पण तारखा जुळेनात. हो नाही करता करता शेवटी आपलं आपण जायचं ठरलं. आंतरजाल मदतीला होतंच.
आंतरजालाच्या मोहमयी दुनियेचं "शोधा म्हणजे सापडेल" हे ब्रीदवाक्य. अगदी आरक्षण कसं करावं, कुठून करावं, सोबत काय घेऊन जावं, काय खावं, काय खरेदी करावी पर्यंत सर्व माहिती उपलब्ध आहे. साधारण २-३ महिने आधीपासून तयारी सुरू करावी लागते.
लेह लडाखला जायचं असेल तर लागणाऱ्या तयारीची सहा प्रमुख अंग आहेत:
१. विमानाचं आरक्षण - लडाख सहलीमधला हा सगळ्यात मोठा खर्च आहे. त्यामुळे विमानाचं आरक्षण जेवढ्या लवकर करता येईल तेवढ्या लवकर करणं आवश्यक आहे. यात्रा कंपनीच्या काही पॅकेजमध्येही विमानाचं आरक्षण आपलं आपल्यालाच करावं लागतं.
२. हॉटेलचं आरक्षण - आधी आपल्या प्रवासच पूर्ण नियोजन करून मगच हॉटेलचं आरक्षण करावं. या प्रवासामध्ये आपल्याला दररोज नवीन ठिकाणी मुक्काम करावं लागतो. यासाठी आपण MakeMyTrip, Yatra, Trivago इत्यादी संकेतस्थळांचा वापर करू शकतो किंवा हॉटेलच्या संकेस्थळाचा उपयोग करू शकतो.
३. लेह पासून पुढील प्रवासासाठी कारच आरक्षण - कारच्या आरक्षणासाठी लेह टॅक्सी युनियन किंवा devilonwheels या संकेतस्थळांवर माहिती उपलब्ध आहे. कारच आरक्षणसुद्धा लवकरात लवकर करावं लागतं. ऐन मोसमात कारची उपलब्धता मिळण्यास अडचण येऊ शकते.
४. औषध - आपल्याला मधुमेह, हृदयविकरासरखे आजार असतील तर ती औषधं सोबत हवीच. त्याच बरोबर Acute mountain sickness, पोट बिघडणे, दुःख निवारक, ॲलर्जी इ. साठी औषधं जरूर सोबत बाळगावीत. सहलीला जाण्याआधी निश्चित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
५. उबदार कपडे - लडाखच्या सहलीमध्ये खूप विविध प्रकारचं हवामान अनुभवायला मिळतं. त्यामुळे लेयर्समध्ये घालता येतील असे कपडे घ्यावेत. कपड्यांमध्ये कानटोपी, हातमोजे, पायमोजे, थर्मल, लोकरीचा स्वेटर आणि बर्फात चालू शकेल असे जाकीट या सर्वांचा आंतर्भाव असावा.
६. इनर लाईन परमिट - जर तुम्ही स्वतः आरक्षण करून जाणार असाल तर लडाख मध्ये काही भागात फिरण्यासाठी इनर लाईन परमिटची गरज असते. तुम्ही ते ऑनलाईन पण घेऊ शकता. त्यासाठी खालील संकेस्थळाला भेट देऊ शकता. https://www.lahdclehpermit.in/
याशिवाय बीएसेनेलचे पोस्टपेड सिमकार्ड घेणं आवश्यक आहे. कारण इथे फक्त बीएसेनेलचे फोन चालतात. काही भागात जिओ पण चालतो. जर खर्च गुगल पे किंवा इतर ऑनलाईन मार्गाने करायचं असेल तर बीएसेनेलचे पोस्टपेड सिमकार्ड अत्यावश्यक! आणि हो पाणी गरम राहील अशी बाटली बरोबर न्यायला विसरू नका!
वर सांगितल्याप्रमाणे आम्ही जय्यत तयारी केली आणि बघता बघता सहलीला जायचा दिवस उजाडला.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
अचूक माहिती कळत आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत. छान लिहिले आहेस.
ReplyDeleteधन्यवाद!! पुढचा भाग लवकरच येईल
Deleteखूपच छान लिहिलं आहे आणि इतकी माहिती पण दिल्यामुळे अजूनच छान.
ReplyDeleteधन्यवाद
Delete