लेह लडाख - भाग ५ सुमुर - पनामिक गरम पाण्याचे झरे, पॅंगॉंग तलाव
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
लेह लडाख - भाग १लेह लडाखची सहल पॅंगॉंग तलावाला भेट दिल्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अखेर आज पॅंगॉंगला जायचा दिवस उजाडला. आज आम्ही साधारण ८:३० वाजता बाहेर पडलो. पॅंगॉंगला जायच्या आधी आम्ही पनामिक गरम पाण्याच्या झऱ्याला भेट दिली.
इतर कुठल्याही गरम पाण्याच्या झऱ्याप्रमाणे इथल्या पाण्यामध्येही सल्फरचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे झऱ्याजवळ पोहोचताच विशिष्ट प्रकारचा गंध येतो. शिवाय हे पाणी औषधोपचारासाठी वापरतात. झऱ्याचं पाणी एवढं गरम आहे की त्यामधे आपण बोट घालू शकत नाही. दुरूनही गरम पाण्याची वाफ दिसते. झऱ्याच्या काठावर छान उबदार वाटतं.
लोकांना तिथे आंघोळ करता यावी यासाठी एक छोटा तलाव बांधला आहे. तलावामध्ये झऱ्याचं गरम पाणी सोडलं आहे. परंतू पाण्याचं तापमान नियंत्रित केलं आहे. शिवाय स्नानगृह बांधलं आहे. सोयी चांगल्या केल्या आहेत. पण आम्हाला पॅंगॉंगचे वेध लागले असल्यामुळे आम्ही अंघोळीच्या भानगडीत पडलो नाही.
पनामिकहून आम्ही परत साधारण खालसार पर्यंत गेलो. तिथून जवळच पॅंगॉंगला जाण्यासाठी फाटा आहे. तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. आजही एका बाजूला श्योक नदी आणि एका बाजूला भूरा पहाड सोबतीला होता.
या भागातल्या पर्वत रांगाही रेती आणि दगडगोटे रचून बनवल्यासारखा वाटत होत्या. ठिकठिकाणी भूस्खलन (land slide) होऊन गेल्याच्या खुणा दिसत होत्या. मधूनच रस्त्यावर गोटे पडलेले दिसत होते. अधून मधून पक्की सडक गायब होत होती आणि कच्चा रस्ता डोकावत होता. मधूनच पाण्याचे छोटे ओहोळ रस्त्यावरून वाहत होते. बरं हे बर्फाच वितळलेल पाणी असतं त्यामुळे त्याचा ठराविक मार्ग नाही. आज इथून तर उद्या तिथून. माणसाचं कर्तृत्व कितीही महान असलं तरी निसर्गापुढे मान तुकावावीच लागते. तरीही माणसाच्या चिकाटीची दाद द्यायला हवी. कारण याही परिस्थितीत अनेक ठिकाणी डागडूजीची आणि रस्ता रुंदीकरणाची कामं चालूच होती.
आम्ही नुकताच हिवाळा संपून उन्हाळा चालू झाला अशा वेळेला गेलो असल्यामुळे ठीक होतं. रस्ता कोरडा होता. नाहीतर रस्त्याच्या काही भागात बर्फ वितळून एवढं पाणी खाली येतं की रस्ता २-३ दिवस बंद होऊन जातो. पाण्याची पातळी कमी असेल तर थोड्या पाण्यातून वाट काढावी लागते. प्रवासही सकाळी लवकर चालू करावा लागतो. एकदा ११:३०-१२ ची वेळ टळली तर काही नक्की सांगता येत नाही. रस्त्यामध्ये छोट्या छोट्या रंगीबेरंगी कॅफे आहेत. आम्ही अशाच एका ठिकाणी जेवण केलं.
आता आम्ही नुब्रा व्हॅली मागे सोडलेली होती. पॅंगॉंगच्या बाजूने चीनची सीमा निकट आहे. या भागात सैन्याच्या चुशुल वॉरियर्सचं वर्चस्व आहे. जागोजागी त्यांच्या आणि किर्तीचक्र बटालियनच्या चौक्या दिसत होत्या. पॅंगॉंगपासून चुशुल साधारण १९० किलोमीटरवर आहे. म्हणजे साधारण पुणे- मुम्बई एवढं अंतर. इथे १९६२ मध्ये चीन बरोबर युद्ध लढलं गेलं होतं. असं सांगितलं जातं की याच ठिकाणी मेजर सैतान सिंह त्यांच्या १२० जवनबरोबर फार शोर्याने लढले होते. १२० जवनांपैकी फक्त ६ जण वाचले. आत्ता २०१९ मध्ये गलवान घाटीमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली होती. ही गलवान घाटी सुद्धा इथून फार दूर नाही.
आमची सतत टॅम्फेलकडे विचारणा (भुणभूणच म्हणावी लागेल!) सुरू होती "अजून किती वेळ लागेल?" आणि अखेर ४ च्या सुमारास पॅंगॉंगच पाहिलं दर्शन घडलं.
दूर क्षितिजापर्यंत पाण्यामध्ये निळ्या आणि हिरव्या रंगाच्या विविध छटा दिसत होत्या. पाहिलं दर्शन झाल्यापासून प्रत्यक्ष काठावर पोहोचायला किमान १५ - २० मिनिटं लागली.
पॅंगॉंग त्सो साधारण १३४ किलोमीटर लांब आहे. हे समुद्रसपाटीासून खूप उंचीवर असलेल्या खाऱ्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे. या अथांग जलाशायाचा रंग सतत निळया हिरव्या रंगाच्या छटांमध्ये बदलत राहतो. फिका निळा, गडद निळा, नेव्ही ब्लू, ऍक्वा, फिका हिरवा, गडद हिरवा.... आम्ही अनिमिष नेत्रांनी कितीतरी वेळ हा रंगांचा नाच बघतच राहिलो.
आम्ही पॅंगॉंगच्या शूटिंग पॉइंटला गेलो. इथेच ३ इडियटस् या चित्रपटातील शेवटच्या दृष्याचं चित्रीकरण झालं होतं. लडाखचं आर्थिक गणित हे बहुतांशी पर्यटनावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लोकांनी निरनिराळया क्लृप्त्या शोधल्या आहेत. जसं की ३ इडियटस् या चित्रपटामधली काही दृष्य खूप गाजली होती - ३ मित्र हौदामध्ये बसून आंघोळ करतात, विशिष्ट आसनावर बसून आपला पृष्ठभाग खाजवतात, करिना कपूर पिवळ्या रंगाच्या स्कूटरवर लाल हेल्मेट घालून वधुवेषात हिरोला भेटायला जाते... या शूटिंग पॉइंटवर स्थानिक लोकांनी पर्यटकांना या सगळ्या गोष्टी करताना फोटो काढता यावेत यासाठी स्कूटर, हेल्मेट, हौद, आसनं असं सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे. ते परडोई आकार (per head charges) घेतात. मग तुम्ही पाहिजे तेवढे फोटो काढा. याकवर बसूनही फोटो काढता येतात.
पॅंगॉंगला राहण्यासाठी तात्पुरत्या राहुट्या (कॅम्प) उभारलेले आहेत. हॉटेल खूप कमी आहेत आणि जी हॉटेल आहेत ती खूप महाग आहेत. इथे हवा फार थंड असते. त्यामुळे कॅम्पमध्ये तंबूत (tent) राहण्याची आमची अजिबात इच्छा नव्हती. पण इथे होम स्टे उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही आजची रात्र एका स्थानिक घरात घालवणार होतो. होम स्टे मध्ये राहण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. जरा धाकधूक वाटत होती.
आम्ही पॅंगॉंगच्या काठावर मान नावाच्या गावात रात्र घालवण्यासाठी पोहोचलो. ते गावातल पहिलंच घर होतं. छोटेखानी होतं. तळ मजल्यावर मालक स्वतः राहत होते आणि पहिल्या मजल्यावर ४ खोल्या पर्यटकांना भाड्याने दिल्या होत्या. खोलीत ३ पलंग आहेत ते बघून बरं वाटलं. त्यावर स्वच्छ चादरी घातल्या होत्या, उश्या होत्या. खिडकी मधून बाहेर पॅंगॉंग तलाव दिसत होता.
बाजुला भोजन कक्ष होता.
तिथे भारतीय बैठक होती. खोलीत एका बाजूला लडाखी भांडीकुंडी मांडून ठेवलेली होती, मध्ये बुखारी होती. बुखारी खोलीमध्ये ऊब राहावी म्हणून असते. आपल्याकडे पूर्वी जसा बंब पेटवायचे तसाच विस्तव बुखारीमधे पेटवतात आणि धूर बाहेर जाण्यासाठी त्याला धुराड केलेलं असतं. विशेष म्हणजे आम्ही ज्या घरात राहत होतो त्यांची मुलगी आईस हॉकी खेळते आणि आंतरदेशीय सामन्यामध्ये भारताकडून खेळते. तिची पदकंही खोलीमध्ये लटकवलेली होती. ते पाहून फार कौतुक वाटलं.
याच मजल्यावर त्यांचं पूजाघरही होतं. खोलीमध्ये एक अख्खी शोकेस भरून बुद्धाच्या मूर्ती/ प्रतिमा होत्या, विविध लामांचे फोटो होते, खूप साऱ्या वाट्यांमध्ये पाणी भरून ठेवलेलं होतं आणि एक अखंड तेवणारा दिवा होता. मालकांची परवानगी घेऊन आम्ही या पूजा घराचा एक फोटो काढला.
पॅंगॉंगहून आकाश फार स्वच्छ दिसतं. प्रकाशाचं प्रदूषण नसल्यामुळें नभांगण चांदण्यांनी भरून गेलं होतं. आम्ही तिथे आकाशदर्शनाचा कार्यक्रम ठरवला होता. पण त्याचा टलिस्कोप दुरुस्तीला गेल्यामुळे तो रद्द झाला. तशीही बाहेर थंडी एवढी होती की आम्ही ५ मिनिटात आत परत आलो. गरम गरम जेवण झाल्यावर जरा बरं वाटलं. तसंही अजून काही करायचं बाकी नव्हतं. त्यामुळे लवकरच गुडूप झालो.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
Wa chanch.
ReplyDeleteधन्यवाद!!
Delete