लेह लडाख - भाग ३ लेह - खारदुंग ला पास - हुंदर सॅंड ड्यून्स
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
लेह पासून ढोबळमानाने ३ वेगळे मार्ग जातात - नुब्रा व्हॅली, पॅंगॉंग आणि शाम व्हॅली. आम्ही यातले नुब्रा व्हॅली आणि पॅंगॉंग हे दोन मार्ग फिरणार होतो. आजचा मार्ग खारदुंग ला पासवरुन नुब्रा व्हॅलीला जाणारा होता.
लेह शहरातून बाहेर पडलो आणि पूर्ण वळणा वळणाचा रस्ता चालू झाला. घाटातून लेहचं मनोहारी दर्शन घडलं.
लेहपासून खारदुंग ला साधारण ३८-३९ किमी वर आहे. पोहोचायला साधारण दीड तास लागतो. घाटातले एकपदरी रस्ते, टोकाची वळणं, एका बाजूला रौद्र पहाड, दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि दरीमधून वाहणारी पाण्याला खळाळ असणारी नदी हे वर्णन हिमालयातल्या बहुतेक कुठल्याही रस्त्याला लागू पडेल. या पूर्ण रस्त्यामध्ये सतत बर्फाच्छादित शिखरांच दर्शन होत होतं.
खारदुंग लाच्या थोडं आधी मुलाला मळमळायला लागलं. मग गाडी बाजूला घेऊन उलटीचा कार्यक्रम झाला. त्यामुळे पुढे काही त्रास होणार नाही ना अशी धाकधूक वाटायला लागली. असो, अशा वेळेला जमेल तेव्हढी काळजी घेण्यापलीकडे काही करता येत नाही.
गाडी जसजशी वर चढत होती, तसतशी हवा थंड व्हायला लागली. ५-१० मिनिटात आभाळ भरून आलं.
सवारी खारदुंगला ला पोहोचेपर्यन्त हिमवर्षावाला सुरूवात झाली. आम्ही तातडीने गरम कपडे अंगात चढवले. मी यापूर्वी बर्फ बघितला होता पण हिमवर्षाव प्रथमच अनुभवत होते. तशी भुरभुरच होती. पण मजा आली.
गाडीतून उतरताना टॅम्फेलने जाणती सूचना केली, "सरजी, आप फोटो वोटो खीच लो और फटाफट वापस आ जाओ. हम यहा १५ मिनिट से ज्यादा नाही रुकेंगे" खारदुंगला समुद्रसपाटीपासून १७९८२ फूट उंचीवर आहे.
आम्हाला इथे बर्फात जायची इच्छा होती. पण टॅम्फेलने आपल्याला पुढे पण बर्फ लागेल असं सांगितलं. त्यामुळे अक्षरशः १०-१२ मिनिटात आम्ही गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. अशा दुर्गम भागामध्ये चालक हाच तुमचा सर्वोत्तम सल्लागार असतो. आता रस्त्याच्या दुतर्फा बर्फ दिसत होता. त्याने सांगितल्या प्रमाणे खरोखरच पुढे खूप बर्फ होता. मोक्याची जागा पाहून त्याने गाडी थांबवली. आणि आम्ही बर्फात भरपूर खेळलो.
बर्फात मनसोक्त खेळून झाल्यावर आम्ही नुब्रा व्हॅली मध्ये जाण्यासाठी घाट उतरायला सुरुवात केली. घाट उतरून झाल्यावर खालसार म्हणून एक गाव आहे. तिथे जेवणासाठी थांबलो. खालसारला राफ्टिंग, गो कार्टिग, ATV राईड करता येत. मुलांनी (बच्चे तो बच्चे बाप रे बाप!) गो कार्टिग आणि ATV राईड केली. त्यांना खूपच मजा आली.
आता पुढचा पडाव दिस्कितला होता. तिथली मोनॅस्ट्री ही या भागातली प्रमुख मोनॅस्ट्री आहे. इथली मैत्रेय बुद्धाची मूर्ती फार भव्य आहे. इथल्या वास्तू शास्त्रावर तिबेटी संस्कृतीचा अधिक प्रभाव आहे. मूर्ती खूप भव्य असल्यामुळे खूप दूर अंतरावरूनही दिसते. दर्शन झाल्यावर मन प्रसन्न आणि शांत झालं.
आजचा शेवटचा पडाव हुंदर होता. हुंदरला मोठे मोठे रेतीचे पहाड (सॅंड ड्यून्स) आहेत. हिमालयात सॅंड ड्यून्सची कधी कल्पनाही केली नव्हती.
इथे दोन वशिंड (double hump) असणारे उंट बघायला मिळतात. त्यांना Bactrian Camel असही म्हणतात. आमच्याकडचे तीनही शहाणे उंटावर बसले. उंटाची सवारी मोठी गंमतशीर आणि थोडी घाबरवणारी असते.
आजचा मुक्काम हुंदरला होता. दिवसभराचा भरपूर शीण होता. त्यामुळे रात्रीचं जेवण झाल्यावर थोड्याच वेळात खोलितले दिवे मालवले आणि सगळे निद्राधीन झाले.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
फार छान लिहिलंयस 👍 कधी जातोय असं वाटतंय 😃
ReplyDeleteलडाख मनाला भूरळ पाडणारा आहेच. नक्की भेट द्या
Deleteमागील वर्षी corona मुळे. लेह लडाख ट्रीप रद्द करावी लागली. आत्ता तुमच्या लिखाणातून ती अनुभवते आहे.
ReplyDeleteजमेल तेव्हा जरूर जाऊन या!
ReplyDelete