लेह लडाख - भाग २ मुंबई ते लेह

आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.

मुंबईहून लेहला जाण्यासाठी रेल्वेमार्ग उपलब्ध नाही. जायचंय असेल तर जम्मुतावीला जाऊन पुढे बस किंवा कारने जायला लागतं. लेह तिथून ७०९ किलोमीटर दूर आहे. त्यामुळे ३०-३२ तासांचा प्रवास आहे. काहीजण श्रीनगरला जाऊन पुढे कारने जातात. त्यापेक्षा थेट विमानाने जाणं सोयीचं आहे. बहुतेक विमान मार्ग दिल्ली किंवा श्रीनगरहून जातात. मुम्बईहून एक थेट फ्लाईट आहे. आम्ही थेट फ्लाईटचं आरक्षण केल होतं. 
आमचं विमान पहाटे ४:०५ वाजता होतं. त्यामुळे पूर्ण रात्र जागून काढायला लागली. रात्री १ वाजता घरून निघालो. सामान जमा केलं आणि मग काय! पुढचा सगळा वेळ प्रतीक्षा करण्यातच गेला. मुंबईचा विमानतळ खूप मोठा आणि व्यस्त आहे. त्यामुळे तिथे अखंड जाग असते. आम्ही तिथे मध्यरात्रीच्या वेळी होतो याची जाणीव फक्त घड्याळाचे काटे करून देत होते. 
आमचं विमान नियोजीत वेळेला निघालं. पहाटेच्या अंधरामध्ये धावपट्टी असंख्य दिव्यांच्या प्रकाशात नाहून निघाली होती. विमानाने आकाशात झेप घेतली आणि मुंबईची झगमगती दुनिया काही क्षणासाठी डोळ्यांसमर  तरळली. मुम्बई असं शहर जे कधीच झोपत नाही. विमान अजून उंचावर गेलं आणि हा झगमगाटही नजरेआड झाला. 
साधारण सव्वा पाचच्या सुमाराला क्षितिजावर पहिली तांबूस रेषा दिसायला लागली. थोड्याच वेळात तांबडी रेषा रुंदावत गेली आणि सूर्याच आगमन झालं. आज पहिल्यांदा "तांबड फुटणे" या वाक् प्रचाराचा साक्षात्कार झाला. 
एव्हाना सूर्योदय झाला होता. आता लेहचे वेध लागले होते. विमान जसं लेहच्या जवळ जायला लागलं तसं हिमशिखारांच दर्शन घडायला लागलं. मनात निमिषमात्र विचार तरळून गेला की ही हिमशिखर आहेत की शुभ्र ढगांचे पुंजके आहेत. ती हिमशिखरच होती. 
अखेर विमान लेहच्या विमानतळावर उतरलं. लेहला पोहोचल्या पोहोचल्या गरम कपड्यांची गरज पडेल याची कल्पना असल्यामुळे विमानात नेलेल्या बॅगेत सगळे गरम कपडे होते. आम्ही विचार केला की विमानात कुठे बॅग उघडा. त्यापेक्षा विमानतळावर आत गेल्यावर गरम कपडे घालू. आम्ही विमानाच्या दारातून पाहिलं पाऊल बाहेर ठेवलं मात्र आणि अंगावर शहारा आला. एकतर तापमान साधारण १०-१२° सेल्सिअस आणि त्यामधे थंड बोचरा वारा. विमानाची शिडी उतरून समोर उभ्या असणाऱ्या बसमध्ये चढेपर्यंत हुडहुडी भरली. बस आत शिरल्या शिरल्या आधी गरम कपडे अंगात चढवले. 
लेहचा विमानतळ खूपच छोटा आहे. अगदी २-३ विमान एका वेळेला थांबू शकतात. सामान उतरवण्यासाठी असणारे पट्टे (conveyor belts) पण अगदी २-३. सामान उतरवून घेतलं. आता आमच्या कारच्या चालकाचा - जिग्मत टॅम्फेलचा शोध. आमचा बीएसएनएलचा फोन सुरू होईना. या सगळ्या प्रकारात अर्धा पाऊण तास गेला. अखेर फोन चालू झाला. टॅम्फेलशी संपर्क झाला आणि आमचा जीव भांड्यात पडला.
लेह शहर खूप छोट आहे. त्यामुळे १०-१५ मिनिटात हॉटेलवर पोहचलो. आपल्याला एवढ्या उंचीची सवय (acclimatisation) व्हावी आणि एएमएसचा (Acute Mountain Sickness) त्रास होऊ नये म्हणून पहिल्या दिवशी पूर्ण विश्रांती. हॉटेलवर गेल्यावर गरमा गरम नाश्ता केला आणि गुडूप झालो. तसंही रात्री जागरण झालं होतच.
संध्याकाळी चालत छोटा फेरफटका मारून आलो. तुम्ही लेहमध्ये कुठेही उभे रहा समोर हिमाच्छादित शिखरं आणि नयनरम्य देखावा दिसतो. इथल्या कॅफे पण एकदम रंगीत सजवलेल्या आहेत. थोडी पोटपूजा केली आणि परत आलो.  
कुणालाच कसलाही त्रास झाला नाही. आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज होतो.

पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.

Comments

  1. वर्णन ओघवते आणि लालित्यपूर्ण आहे. .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!! ही तर शुक्लांना मिळालेली देणगी आहे

      Delete
  2. चला निघायची तयारी करतो. वर्णन अवर्णनीय. मोहात पाडत आहे

    ReplyDelete
  3. लडाख मोह पाडेल असाच आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लेह लडाख - भाग ३ लेह - खारदुंग ला पास - हुंदर सॅंड ड्यून्स

लेह लडाख - भाग ४ हुंदर - थांग नियंत्रण रेषा (एल ओ सी), तुरतुक, सुमुर

लेह लडाख - भाग ६ पॅंगॉंग - चांग ला पास, हेमीस मोनॅस्टरी, थिकसे मोनॅस्टरी