लेह लडाख - भाग ८ परतीचा प्रवास, आठवणींचे कवडसे
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
लेह लडाख - भाग १आमची आजची फ्लाईट सकाळी ६:५० वाजताची होती. विमानतळावर गेल्यावर ती उशीराने निघणार असल्याचं समजलं. आजचा आमचा प्रवास थेट मुंबईला नव्हता. दिल्लीला विमान बदलायला लागणार होतं. सुदैवाने २०-२५ मिनिटापेक्षा जास्त उशीर नव्हता. साधारण ७.२० च्या अंदाजात विमानाने दिल्लीच्या दिशेने उड्डाण केलं. तेव्हा सूर्योदय झालेला होता आणि सगळीकडे लख्ख प्रकाश पसरला होता. मागच्या वेळेपेक्षा या वेळी दिसणारं दृष्य फारच अद्भूत होतं.
दिल्लीला विमानतळावर पोहोचल्यावर कळलं की पुढे मुम्बईला जाणारं विमानसुध्दा उशिरा जाणार आहे. किमान २-३ तास तरी विमानतळावर थांबायला लागणार होता. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी या न्यायाने एकदा परतीचा प्रवास सुरु झाल्यावर घराची ओढ लागली होती. करणार काय? वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. अखेर घरी पोहोचायला संध्याकाळ झाली. प्रवास सुखरूप झाला.
प्रवास संपला तरी लडाख प्रवासातले असे काही कवडसे आहेत की ज्यांचा ठसा सहजासहजी मनातून पुसला जाणार नाही. अशाच काही गोष्टी ज्या नजरेतून सुटल्या नाहीत पण आधीच्या लेखांमध्ये डोकावल्याही नाहीत:
१. "जुले सर" किंवा "जुले मॅडम" असं म्हणून आपलं सगळीकडे स्वागत होतं. "जुले" म्हणजे आपल्या भाषेत "राम राम" किंवा "नमस्ते"/ "हॅलो"
२. इथली घरं बहुधा बसकी एक मजली किंवा दोन मजली असतात. घराला मोठ्या खिडक्या असतात. बहुतेक वेळेला काचेच्या असतात. भरपूर सूर्प्रकाश आत यावा म्हणून असेल कदाचित. या खिडक्यांच्या वर लाकडाचं नक्षीकाम केलेलं असतं.
३. लडाखमध्ये बहुतेक सगळ्या घरांवर आणि हॉटेलवर सोलर पॅनल लावलेली आहेत. ६ महिने लडाख पूर्ण बर्फाखाली झाकला जातो. बऱ्याच ठिकाणी बर्फाच वितळलेल पाणी वापरलं जातं. शिवाय इथलं तापमान उन्हाळ्यामध्येही कमीच राहतं. त्यामुळे इथे गरम पाण्याची सतत गरज वाटते. इथे वीज पोहोचलेली आहे. पण सौर ऊर्जेच्या वापरावर भर आहे.
४. जिथे जिथे मनुष्य वस्ती आहे तिथे तिथे चिनारची (poplar) झाडं दिसतातच. हिवाळ्याच्या दिवसात सर्पण म्हणून त्याचा उपयोग होतो.
५. स्वच्छता अभियान - खरं सांगायचं तर पूर्ण देशातच स्वच्छता अभियान राबवल जातं आहे. पण अनेक ठिकाणी हे अभियान म्हणजे जागोजागी लावलेले फलक होऊन राहिलं आहे. लडाखमध्ये त्या मानाने लोकवस्ती विरळ आहे. शिवाय लष्करी खाक्या आहे. त्यामुळे लेह आणि लडाख बऱ्यापैकी स्वच्छ आहे. शिवाय भारतीय सैन्याने सियाचेन ग्लेशियर वरून १३० टन कचरा कसा साफ केला ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. काही ठिकाणी लष्कराने कल्पकपणे कचऱ्यातून कलाकृती तयार करून संदेश सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. हा एक अशाच कलाकृतीचा नमुना.
पर्यटकांमुळे तिथे कचरा नियोजनाचा प्रश्न भेडसावायला लागला आहे.
६. लडाखमध्ये तिबेटच्या महायान बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. इथले लोक खूप धार्मिक वृत्तीचे आहेत. बहुतेक बौद्ध घरांवर आपल्याला प्रार्थना लिहिलेल्या पताका (Prayer flags) लावलेले दिसतील. फक्त घरावराच
नाही तर रस्त्यावर, दुकानामध्ये, पुलांवर, प्रार्थना स्थळांवर, पहाडावर सगळीकडेच लावलेल्या दिसतात.या पताकांवर प्रार्थना लिहिलेली असते. असं मानलं जातं की या पताका सगळीकडे शांती आणि सद्भावना पसरवतात.
७. लडाख मध्ये रस्तोरस्ती, गल्लोगल्ली प्रार्थना चक्र (prayer wheels) बघायला मिळतात. त्यांना लडाखी भाषेमध्ये "माने/ माणे" (नक्की उच्चार सांगणं थोडं कठीण आहे) म्हणतात. या चक्रांवर मंत्र लिहिलेले/ कोरलेले असतात. इथल्या धार्मिक समजुतीप्रमाणे हे चक्र फिरवल्याने आपले पाप/ दोष नाहीसे होतात. म्हणूनच येता जाता जेव्हा शक्य असतं तेव्हा लोक हे चक्र फिरवतात. हे चक्र डावीकडून उजवीकडे फिरवलं जातं.
८. आपल्याकडे जशी प्रत्येक रस्त्यावर छोटी मारुती/ गणपतीची मंदिरं असतात तसेच इथे जागोजागी छोटे छोटे स्तूप बांधले आहेत. हे स्तूप म्हणजे दगड विटा माती मंदिराच्या आकारात रचून तयार केलेले असतात. त्यावर कधी मंत्र लिहीलले असतात, तर कधी नसतात. कधी कधी असे अनेक स्तूप शेजारी शेजारी बांधलेले दिसतात. लोक या स्तूपाला प्रदक्षिणा घालतात. लोकच कशाला! अहो बाजूने जायला जागा असेल तर गाडी चालक जाता जाता गाडी सरळ न नेता या स्तूपाला गाडीने प्रदक्षिणा घालून पुढे जातात.
९. या एका आठवड्यामध्ये आम्ही एवढा प्रवास केला पण गाडीच्या चालकांमध्ये एकही भांडण बघायला मिळालं नाही. ओव्हरटेक करण्यावरून नाही, गाडी मध्ये घुसवण्यावरून नाही. इथे बहुतेक सगळे रस्ते एकपदरी आहेत. तेव्हा समोरून गाडी आली तर कोण बाजूला सरकणार यावरूनही वाद नाहीत. एकंदरीत लोक शांत आहेत. चंद्राची शीतलता लोकांच्या वागण्यात उतरली आहे. उगीच नाही लडाखला चंद्राची भूमी म्हणत!
मी यापूर्वीही अनेकदा हिमालयाची सफर केली आहे. तिथे जंगलं होती, हिरवाई होती. निसर्ग सौंदर्य होतं. बर्फाच्छादित शिखरं होती. बघण्यासाठी खूप स्थळं होती. जर तुम्ही फक्त पर्यटन स्थळाचे शौकिन असाल तर लडाख तुमच्यासाठी नाही. जर प्रवासाचा आस्वाद घेणारे असाल तरच प्रवासात मजा येईल.
कारण लडाख या आखीव रेखीव सोंदर्याच्या कल्पनेमध्ये बसत नाही. इथले पहाड बोडके आहेत. झाडं अभावानेच बघायला मिळतात. सगळीकडे तपकिरी आणि भुऱ्या रंगाचं साम्राज्य आहे. त्यामध्ये वेगळंच सौंदर्य दडलेले आहे. इथलं आकाश निळशार आहे. नभांगण चमचमणाऱ्या ताऱ्यांनी भरलेलं आहे. आणि हिमाच्छादित शिखरं आभाळाला जाऊन भिडलेली आहेत.
पण ह्याच भुऱ्या पहाडावर भूस्खलन आणि हिमस्खलन होत राहतं. पाऊस दडी मारतो. श्योक नदी आहुती मागत राहते. निसर्ग अनेकदा रौद्र रूप धारण करतो. आणि या निसर्गाचं आव्हान स्वीकारत आपले जवान २४ तास डोळ्यात तेल घालून उभे आहेत.
निसर्गाच सौंदर्य आणि रौद्र रूप एकाच वेळेला अनुभवायला मिळतं. ही जशी बुध्दाची शांतता आणि अहिंसेचा संदेश देणारी भूमी आहे तशीच अनेक शतकांपासून युद्धभूमी आहे. इथल्या जवानांकडे पाहिलं की जाणीव होते की आपण किती स्वतः मध्ये मग्न होऊन राहिलो आहोत.
आणि त्यामुळेच लडाख हे केवळ एक पर्यटन नाही तर ती एक भावना आहे. एक जाणीव आहे. आठवणी मनातून पुसल्या जाऊ शकतात पण जाणीवेची ज्योत कायम मनात तेवती रहाते आणि आयुष्यभर साथ देते. तुम्हीही या सगळ्याचा जरूर आस्वाद घ्या!
समाप्त
शेवटचा परिच्छेद तर फारच भन्नाट. जाण्याचे नक्की केले आहे.
ReplyDeleteशेवटचा परिच्छेद पूर्ण लेखमालेची प्रेरणा आहे
Deleteलडाख एक भावना आहे. सुंदर वाक्य. सर्वच लेखमाला खूप छान गुंफली आहे. - शिल्पा मुळ्ये
ReplyDeleteधन्यवाद
Deleteअतिशय सुंदर लिखाण
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteवा सुरुवातच इतकी छान झाली आहे. पुढचे भाग वाचण्याची उत्सुकता वाढवलीत तुम्ही.
ReplyDeleteधन्यवाद!!
ReplyDeleteसर्व भाग वाचले. एकदम छानच वर्णन केलेले आहे. वाचल्यानंतर कोणालाही तिकडं जायची तीव्र इच्छा होईल. फोटो पण फारच सुंदर काढलेले आहेत.
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete