लेह लडाख - भाग ४ हुंदर - थांग नियंत्रण रेषा (एल ओ सी), तुरतुक, सुमुर
आधीचा भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
आज आमचा प्रवासाचा तिसरा दिवस. आजचा दिवसभराचा कार्यक्रम फक्त तुरतुकला जाऊन येणे एवढाच होता.
तुरतुकबद्दल थोडी माहिती सांगणं संयुक्तिक ठरेल. तुरतुक हे भारत - पाक सीमेवरच शेवटचं गाव आहे. तसं पाहायला गेलं तर लौकिकार्थाने थांग हे शेवटचं गाव आहे आणि तिथूनच नियंत्रण रेषा जाते. तुरतुक हे गाव बाल्टिस्तान भागातलं आहे. १९७१ मधे पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात हे गाव भारतात आलं. बाकीचा बाल्टिस्तानचा भाग पीओके मधे आहे. इथे राहणारे लोक बाल्टी/ बल्ती वंशाचे आहेत. त्यांचे आचार, विचार, राहणी लडाखी लोकांपेक्षा भिन्न आहे.
आपण पुढे जाण्याआधी अजून एक निरीक्षण नोंदवण योग्य होईल. मुंबई मधे बसून आपण नेहेमीच ऐकलं आहे की लेह - लडाखचा भाग लष्कराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. खारदुंग ला, चांग ला हे महामार्ग सैन्याची हालचाल करणे, रसद पुरवठा करणे यासाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लेह मध्ये पाऊल ठेवल्यापासून एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे ठायी ठायी सैन्याच अस्तित्व. लडाखमध्ये स्थानिक माणसांपेक्षा सैन्याची वस्ती जास्त आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. एकवेळ घरं दिसतील न दिसतील पण सैन्याची छावणी नक्की दिसेल. नुब्रा व्हॅली भागात सियाचेन वॉरियर्सचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जागोजागी "Siachen Warriors Courage and Fortitude" आणि त्यांचं बोधचिन्ह असलेले फलक दिसतात.
तसेच या दुर्गम सीमा प्रांतामध्ये रस्ते तयार करण्याचं काम "बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन" करते. लडाखमधले पहाड अगदी बोडके आहेत. त्यांनी या प्रचंड वेगवान नद्यांवर अनेक पूल बांधले आहेत. पूल दिसायला साधे दिसतात पण मजबूत आहेत. या पुलावरून सैन्याचा ट्रॅकचा जथा सहज जाऊ शकतो. बहुतेक पूल बोल्डर एकमेकांना जोडून केलेले आहेत. खालून आधारासाठी मध्ये एकही खांब नसतो. सैन्य म्हंटल की शिस्त आणि स्वच्छ्ता आलीच. लडाखमध्ये तुम्हाला या गोष्टी जागोजागी अनुभवायला मिळतात.
इथे हिवाळ्याचे ६ महिने बर्फ असतो. इतर वेळेला तोच बर्फ वितळतो मग कुठे पूर येतो, कुठे भूस्खलन (land slide) होतं तर कुठे हिमस्खलन होतं, कुठे नदीच पात्र बदलतं. जागोजागी "land slide prone area", "Avalanche area" असे वैधानिक इशारा देणारे फलक लावलेले दिसतात. नैसर्गिक परिस्थिती एवढी प्रतिकूल आहे की आपलं सैन्य आणि बीआरओच काम पाहिलं की ऊर अभिमानाने भरून येतो आणि त्याच वेळेला मस्तक आदराने झुकतं.
तर या सगळ्या पार्श्वूमीवर आम्ही तुरतुकच्या दिशेने प्रस्थान ठेवलं.
मी वर सांगिल्याप्रमाणे इथल्या पर्वत रांगा पूर्ण बोडक्या आहेत. हिरव्या रंगाचं नामोनिशाण नाही. फक्त राखाडी आणि तपकिरी रंगाच्या विविध छटा! असं वाटतं की या पर्वत रांगा दगड गोट्यांच्या मोठ्या मोठ्या चळती रचून तयार झाल्या आहेत. एक धक्का लागेल आणि अख्खा पहाड खाली येईल.
एका बाजूला श्योक नदीचा खळखळाट आणि एका बाजूला पहाड असा पूर्ण रस्ता होता. तुरतुकजवळ सैन्याच ठाण आहे. ओळखपत्र पडताळून पुढे सोडण्यात आलं.
आम्ही आधी थांगला गेलो. तिथून नियंत्रण रेषा फक्त २.५ किलोमीटरवर आहे. थांगला एका पर्यटक स्थळापाशी नेलं. तिथून नियंत्रण रेषा दिसते. नदी नैसर्गिक विभाजकाच काम करते. नदीच्या एका बाजूला भारत आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. या विभाजनाप्रमाणे आम्ही भारताच्या मातीवर तर उभे होतो. पण वरती दिसणारी शिखरं पाकिस्तानची आहेत. तिथे "You are under enemy surveillance" अशा पाट्या बघून उगाच जिवाची धकधक वाढते.
तिथे दुर्बीण भाड्याने दिली जाते आणि स्थानिक लोक कुठे काय बघायचं हे समजावून सांगतात. तर वरच्या फोटोमध्ये जी काळपट रेषा दिसते ती नदी आहे. त्या रेषेच्या अलीकडे भारत आहे आणि पलीकडे पाकिस्तान आहे. जो समोर खाली हिरवा पट्टा दिसतो तो पाकिस्तान. आणि दूरवर दिसणारा हिरवा पट्टा आहे ते पाकिस्तानातल गाव फारनू आहे. दुर्बिणीमधून तिथली इमारत दिसते. कदाचित मशीद किंवा दर्गा असावा. कुठलाही सीमा प्रांतामध्ये असतात तशा ताटातूटीच्या कहाण्या इथेही आहेत. आपलं माणूस समोर नजरेला दिसतं पण भेटता येत नाही. मी यापुर्वीही सीमाभागात गेली आहे जसं बद्रीनाथ जवळच चीन सीमेवर माना गाव आहे किंवा नेपाल सीमेवरच धारचुला गाव आहे. पण ही दोन्ही ठिकाण शांत आहेत. तिथे कधी युद्ध लढली गेली नाहीत. पण इथे युद्ध झालेलं आहे आणि ही अशांत सीमा आहे. त्यामुळे इथे मनात वेगळीच भावना निर्माण झाली. थोड्याशा भारावलेल्या स्थितीतच तिथून निघालो.
थांगहून तुरतुकला आलो. साधारण ११-१२ किलोमीटर अंतर आहे. तुरतुकला आल्यावर पहिल्यांदा पोटपूजा केली. आज इथे आम्हाला स्थानिक अन्न खायला मिळालं. किसिर विथ त्सामिक (बकव्हीटच्या पीठापासून बनवलेली रोटी/ उत्तपा आणि दह्यात भाज्या घालून केलेला रायता) आणि व्हेज थुकपा (नूडल सूप). लडाखी अन्न आपल्यापेक्षा थोडं सपक किंवा फिक असतं. पण चविष्ट होतं.
जेवण झाल्यावर आम्ही याबगो पॅलेस पाहायला गेलो. रस्ता एकदम छोटा पण पक्क्या दगडांनी बांधलेला होता. वाडा बाहेरून तर लाकडी दिसत होता. इथल्या इतर घरांप्रमाणे दरवाज्याची उंची कमी होती पण दरवाज्यावर मोठा गरुड विराजमान होता. आम्ही तिकीट घेऊन आत गेलो.
आत गेल्यावर घराच्या दरवाज्यावर आयबेक्सची शिंग लावली होती. तिथल्या मान्यतेप्रमाणे ही शिंग लावणं शुभ समजलं जातं.
आत बेल्यावर एक छोटा चौक आहे. वरच्या मजल्याचे कठडे पूर्ण लाकडाचे आहेत. आणि त्यावर बाल्टी/ बल्ती प्रकारची कलाकुसर आहे. लाकडाचे छोटे तुकडे जोडून आणि रंगवून हे काम केलं जातं.
तसं पाहायला गेलं तर हा वाडा नाहीचे तर वाड्याचे उरले सुरले अवशेष आहेत. तिथे पूर्वी दरबार भरायचा ती खोली आणि स्वयंपाक घर अशा २-३ खोल्याच शिल्लक आहेत. याबगो पॅलेसची महिती देण्यासाठी एक ६०-६५ वर्षांचे गृहस्थ उभे होते. अंगात कपडे तसे साधेच होते पण गावातून जाताना इतर लोकांच्या अंगावर जे कपडे दिसले होते त्यापेक्षा निश्चित उच्च प्रतीचे होते. त्यांच्या हातात एक लाकडी छडी होती. त्यावर तांब किंवा एखाद्या मिश्र धातूच आवरण होतं आणि कोरिव नक्षीकाम केलेल होत. छडी मोठी ऐटदार होती. एकंदरीत व्यक्तिमत्त्व भारदस्त होतं. त्यांनी अस्खलित इंग्रजीमध्ये माहिती द्यायला सुरुवात केली. नंतर कळलं की ते स्वतः तिथले राजा याबगो मोहम्मद खान काचो आहेत. तेच या वाड्याची व्यवस्था पाहतात. ते साधारण सहाव्या शतकापासून त्यांची वंशावळ सांगतात. सांगतात म्हणजे त्यांनी एका मोठ्या भिंतीवर ती चितारून ठेवली आहे.
त्यांनी थोडक्यात तिथला इतिहास सांगितला. त्या जागेच धोरणात्मक दृष्टीने महत्त्व सांगितलं. तुरतुकहून चालत गेलं तर कारगिल फक्त ५ दिवसांवर आहे. १९७१च्या युद्धामध्ये याबगो पॅलेसमधे पाकिस्तानी सैन्याच मुख्यालय होतं. युद्धानंतरही पाकिस्तानी सैन्य जागा खाली करायचं नाव घेत नव्हतं. शेवटी त्यांच्या आजोबांनी लाहोरच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली आणि ती केस जिंकली. लाहोर न्यायालयाने सैन्याला ती जागा खाली करायला सांगितली आणि दर दिवसाचे ५ रुपये याप्रमाणे भरपाई द्यायला सांगितली. त्या निर्णयाची प्रत आजही तिथे फ्रेम करून ठेवली आहे. पाकिस्तानी सैन्याने न्यायालयाचा आदेश तर मानला पण जाता जाता वाड्याची जाळपोळ आणि नासधूस करून गेले.
पॅलेसमध्ये छोटेखानी संग्रहालय आहे. तिथे जुन्या तलवारी, शिरस्त्राण, दागिने, न्यायालयाच्या निर्णयाची प्रत, कारगिल युद्धात भारतीय सैन्याकडून मिळालेली कौतुकाची दाद इ. गोष्टी मांडून ठेवल्या आहेत.
शिवाय स्वयंपाक घरात वापरली जाणारी चांदीची आणि दगडाची भांडी बघायला मिळाली. एक विशिष्ठ प्रकारचं कुलूप बघायला मिळालं. दोन खिळे होते. विशिष्ठ किल्लीने नेमका जोर दिल्यावर ते उघडतं. जोर कमी किंवा जास्त झाला तर नाही उघडत. या सगळ्या गोष्टी पाहिल्यावर अंतःकरण थोडं जड झालं. कुठे एका जमान्यात असणारं मोठं राजघराणं आणि कुठे बिना रयतेचा राजा. थोड्या जड अंतःकरणाने आम्ही बाहेर पडलो.
परत जाताना आम्ही श्योक वॉर मेमोरियल बघण्यासाठी थांबलो. इथे सियाचेनमधे शहीद झालेल्या जवानांच स्मारक आहे. इथे शेकड्यांमध्ये शहीद जवानांची नाव बघून मन थोडा वेळ सुन्न झालं. काहीजण युद्धात शहीद झाले आणि कितीतरी जवान सियाचेन हिमनगावर सीमेच रक्षण करताना निसर्गाच्या प्रकोपाला बळी पडले. एवढं सगळं असूनही नवीन जवान देशाच्या रक्षणासाठी तत्पर आहेत आणि आजही सगळ्याला धैर्याने तोंड देत निडरपणे उभे आहेत.
मी सियाचेनवर आधीसुद्धा माहितीपट बघितले आहेत. कुठलीच माहिती नव्याने मिळाली नव्हती. पण या गोष्टी टी. व्ही वर पाहणे आणि प्रत्यक्ष अनुभवणे यात जमीन अस्मानाचा अंतर आहे. तिथे सियाचेनमधे जवान कसे रहातात ते कळाव म्हणून एक बंकर उभारला आहे, त्यांचे कपडे आणि बूट बघायला ठेवले आहेत. तसेच बर्फामध्ये उपयोगी पडणारी साधनं ठेवली आहेत. स्नो स्कूटर ठेवली आहे. एक भेटवस्तूच दुकान आहे. या स्मारकाच्या बाहेर श्योक नदीचं पात्र आणि त्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
आमचा आजचा मुक्काम सुमुर गावामध्ये होता. साधारण ६:३० - ७:०० च्या सुमारास हॉटेलवर पोहोचलो. आज भरपूर थकून गेलो होतो.त्यामुळे जेवण करून आमची अळीमिळी गुपचिळी झाली.
पुढील भाग वाचण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
खूप सुंदर वर्णन. अगदी सगळे चित्र डोळ्या समोर उभे राहिले.
ReplyDeleteधन्यवाद!!
ReplyDelete